वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
संपादकीय
*मुंबई-* दादर भागातील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास कोणीतरी हा प्रकार केल्याचा प्राथमिक संशय आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून अज्ञाताचा शोध घेतला जात आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी, उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांचा पुतळा मुंबईतील दादर पश्चिम भागातील शिवाजी पार्कच्या एन्ट्री गेटच्या मध्यभागी आहे. माँसाहेब म्हणूनही त्यांना संबोधलं जातं. 1995 मध्ये मीनाताईंचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पवित्र स्मृतींमध्ये या पुतळ्याची उभारणी करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकही याच परिसरात आहे. मीनाताईंच्या पुतळ्याजवळ कोणीतरी लाल रंग फेकून विटंबना करण्याचा प्रयत्न केला. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने पुतळ्याची सफाई केली.
लाल रंग हा ऑइल पेंट रंग होता. एखाद्या गर्दुल्याने रंग फेकल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे, मात्र ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत आरोपीचा शोध घेण्याची मागणी केली आहे. कुणीतरी रंग फेकण्याचा प्रयत्न केला आहे. या समाजकंटक किंवा भेकडांच्या औलादीला कोणती संस्कृती, कोणते संस्कार झालेले नसतील. यांचा पोलिसांतर्फे शोध घेतला जात आहे. जे व्हायचं ते होईल, अशा प्रवृत्तींना पोलीस किंवा सरकारी यंत्रणा काय, आज तुमचे जे काही कर्तव्य आहे, ते नेमकं त्यावर काय चाललंय का, याचा निषेध करण्यापलीकडील या गोष्टी आहेत आणि त्यामुळे सरकार अपयशी ठरलं हे आपल्या प्रत्येक वेळी जाणवत आहे, असे खासदार अनिल देसाई म्हणाले.


Post a Comment
0 Comments