वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
मोहन दिपके
औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे ढेगज येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराच्या जागेवर अमोल लिंबाजी इंगोले व धुळाजी लिंबाजी इंगोले या दोघा भावांनी मागील दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. या संदर्भात समस्त बौद्ध समाजाने वारंवार ग्रामपंचायतला कळवूनही सरपंच आणि ग्रामसेवक यांनी कोणतीही दखल घेतली नाही तसेच अतिक्रमण करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई किंवा नोटीस दिली नाही.
यामुळे अतिक्रमणधारकांनी आता पुतळा परिसरात बांधकामही केले असून परिसरातील हातपंपावरही अतिक्रमण झाले आहे. यामुळे गावकऱ्यांना पाणी भरण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अतिक्रमण थांबविण्याची विनंती केल्यावर अतिक्रमणधारकांनी सांगणाऱ्या व्यक्तींना शिवीगाळ व मारण्याच्या धमक्या दिल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या त्रासाला कंटाळून सर्व बौद्ध समाजाने पंचायत समिती कार्यालय, औंढा नागनाथ समोर दि. 17 सप्टेंबर 2025 पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषण स्थळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी भेट देऊन लवकरच अतिक्रमण काढण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच ग्रामपंचायत ढेगजचे ग्रामसेवक श्री. गोरे यांनी उपोषणकर्त्यांना भेटून आठ दिवसांच्या आत अतिक्रमणधारकांना कायदेशीर नोटीस देऊन, पोलीस बंदोबस्तात सर्व अतिक्रमण काढून टाकले जाईल असे आश्वासन दिले आहे.
परंतु, जोपर्यंत प्रशासनाकडून प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्याची कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका ढेगज येथील बौद्ध समाजाने घेतली आहे.
या आमरण उपोषणामध्ये सरुबाई पुंडगे, देऊबाई पुंडगे, केशराबाई पंडित, राधाबाई पंडित, संजूबाई पुंडगे, रंजनाबाई खिल्लारे, सागराबाई पंडित, शांताबाई पंडित, ज्योती पंडित, दीक्षाबाई बनसोडे, सुरेश पंडित, तुळशीराम पंडित, राहुल पंडित, राष्ट्रपाल पंडित, किशोर पंडित, अर्जुन पुंडगे, सिद्धार्थ खिल्लारे, सचिन पंडित, अमोल खिल्लारे, भीमराव पुंडगे, मदन पंडित, दिलीप पंडित, गणपत पंडित, किशोर पंडित यांचा सक्रिय सहभाग असून उपोषण सुरूच आहे.


Post a Comment
0 Comments