Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

निळा ध्वजाच्या अस्मितेसाठी बेरूळा येथील भीमसैनिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर लॉंग मार्च व बिऱ्हाड आंदोलन.



वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

 प्रतिनिधी : मोहनजी दिपके.


हिंगोली – औंढा नागनाथ तालुक्यातील बिरूळा गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील निळा ध्वज प्रशासकीय बळाचा वापर करून काढून टाकल्याच्या निषेधार्थ बेरूळा येथील सर्व बौद्ध समाज बांधव आणि भीमसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर लॉंग मार्च व बिऱ्हाड आंदोलन छेडले आहे.


दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजी औंढा नागनाथ येथील तहसीलदार, पोलिस निरीक्षक व पोलिस पथक यांनी जेसीबीच्या साहाय्याने बिरूळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील निळा ध्वज उखडून टाकला. यावेळी महिलांसोबतही अपमानास्पद वागणूक केल्याचा आरोप बौद्ध समाजाकडून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे समाजाच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या असून, प्रशासन व पोलिसांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.



यासंदर्भात कोणतीही तक्रार नसताना प्रशासनाने दडपशाहीच्या मार्गाने केलेल्या या कृतीविरोधात बेरूळा येथील सर्व समाजबांधव व माता-भगिनींनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला. "स्थानिक प्रशासन व पोलिसांवर कायदेशीर कारवाई करून आमचा अस्मिता असलेला निळा ध्वज त्याच ठिकाणी पूर्ववत लावण्यात यावा," अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.


दिनांक ६ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून बेरूळा येथून सुरू झालेला लॉंग मार्च चालत चालत मुक्काम करत हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला आहे. आंदोलनकर्त्यांनी कार्यालयासमोरच बिऱ्हाड करत पंगती धरून जेवणाची व्यवस्था केली आहे. "तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, जोपर्यंत निळा ध्वज परत लावण्यात येत नाही व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही," असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.


या आंदोलनाला हिंगोली जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, पक्ष आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दर्शवला असून आंदोलन अधिक तीव्र झाले आहे.




Post a Comment

0 Comments