वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :रितेश साबळे .
गंगापूर–वैजापूर महामार्गावर वर्खेड पाटीजवळ सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात त्रिकोणी कुटुंबाचा करुण अंत झाला. या दुर्घटनेत पती, पत्नी आणि त्यांचा एक वर्षांचा मुलगा जागीच ठार झाले.
मृतांची नावे साजन राजपूत (२८), पत्नी शीतल (२४) आणि त्यांचा मुलगा कृष्णकुंज (१ वर्ष) अशी आहेत. हे तिघेही दुचाकीवरून जात असताना, समोरून चुकीच्या लेनमधून भरधाव वेगाने येणाऱ्या SUV ने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत साजन राजपूत हे घरातील एकमेव कमावते होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
SUV चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला असून, शिलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत चालकाने चुकीच्या बाजूने वाहन चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या भीषण घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, संबंधित रस्त्यावर पोलिस चौकी उभारावी व वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.


Post a Comment
0 Comments