Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

हिंगोलीच्या बांधकाम कामगार कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना; आंबेडकरी समाजाकडून तीव्र निषेध



वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻

मोहन दिपके 

हिंगोली – हिंगोली येथील बांधकाम कामगार कार्यालयाच्या शासकीय इमारतीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडूनच विटंबना झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे आंबेडकरी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली असून नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (NDMJ) चे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदीप वसंतराव दिपके यांनी कामगार अधीक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांवर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक अत्याचार (ॲट्रॉसिटी) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.


१७ सप्टेंबर २०२५ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त बांधकाम कामगार कार्यालयात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. नियमाप्रमाणे महापुरुषांच्या प्रतिमा टेबल किंवा खुर्चीवर ठेवून त्यांचा सन्मान करणे अपेक्षित होते. परंतु, कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पायदळी ठेवून ध्वजारोहण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर प्रकाराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.




याच कार्यालयात यापूर्वी एस. जी. फड यांनी महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त त्यांची प्रतिमा टेबलावर ठेवून, खाली पांढरे वस्त्र अंथरून सन्मान केला होता. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेबाबत जाणीवपूर्वक अपमान झाल्याचा आरोप आंबेडकरी समाजाकडून केला जात आहे.


नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (NDMJ) चे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदीप वसंतराव दिपके, जिल्हा सचिव दलित नामदेव दिपके, नागसेन भिमराव नांगरे, लक्ष्मण अर्जुन कोल्हे, मारोती गणेश खंदारे, वैभव वैजनाथ दिपके यांनी जिल्हाधिकारी हिंगोली, पोलिस अधीक्षक हिंगोली आणि पोलिस निरीक्षक (शहर) हिंगोली यांना निवेदन देऊन कामगार अधीक्षक एस. जी. फड आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक अत्याचार कायद्याचे कलम ३(१)(व्ही) तसेच भारतीय न्याय सहिता व इतर प्रचलित कायद्यांनुसार गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.


या घटनेवर संपूर्ण हिंगोली जिल्ह्याचे लक्ष लागले असून पुढील काही दिवसांत प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




Post a Comment

0 Comments