५ सप्टेंबर हा दिवस भारतीय जनतेसाठी केवळ एक स्मरणदिन नाही, तर कृतज्ञतेचा, आदराचा आणि प्रेरणेचा दिवस आहे. हा दिवस आपल्याला “शिक्षक म्हणजे काय? आणि त्यांच्या योगदानाशिवाय समाजाची कल्पनाही करता येत नाही” हे अधोरेखित करून देतो. माजी राष्ट्रपती, तत्वज्ञ आणि खरे अर्थाने "विद्यार्थ्यांचे गुरु" ठरलेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आपण शिक्षक दिन साजरा करतो.
आजचे शिक्षक केवळ शालेय अभ्यासक्रम शिकवणारे राहिलेले नाहीत, तर ते विद्यार्थ्यांच्या जीवनाचे खरे शिल्पकार झाले आहेत. ज्ञान, संस्कार, चारित्र्य, नैतिक मूल्ये, सामाजिक जाणीव, राष्ट्रप्रेम – या सर्व गोष्टी एका खऱ्या शिक्षकाकडून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात. म्हणूनच एखाद्या राष्ट्राची खरी प्रगती तिच्या शिक्षकांच्या गुणवत्तेवर व त्यागावर अवलंबून असते, असे म्हणावे लागेल.
गुरूंविषयी भारतीय परंपरेत ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः’ अशी संस्कृती आहे. म्हणजेच शिक्षक हा केवळ अध्यापक नसून देवतुल्य मानला जातो. एखाद्या मुलाचे आयुष्य घडवण्याची ताकद त्याच्या शिक्षकाकडे असते. अनेक मोठमोठे समाजसुधारक, वैज्ञानिक, राजकारणी, साहित्यिक व विचारवंत यांनी आपल्या जीवनात मिळवलेल्या उंचीमागे त्यांच्या गुरूंचा मोलाचा वाटा होता, हे विसरून चालणार नाही.
आजच्या बदलत्या काळात शिक्षणपद्धती बदलली आहे. तंत्रज्ञानाने ज्ञानसंपादनाची दारे रुंदावली आहेत. पण तरीही "गुगल" किंवा "मोबाईल" कधीच शिक्षकाची जागा घेऊ शकत नाही. कारण यंत्र केवळ माहिती देते, पण माणूस घडवतो तो खरा शिक्षकच!
आज समाजाने शिक्षकांचा सन्मान राखला पाहिजे. त्यांच्या कार्याची दखल घेतली पाहिजे. कारण राष्ट्रनिर्मितीच्या पायाभूत रचनेत शिक्षकांची भूमिका सर्वात मजबूत विटा रचणाऱ्या कारागिरासारखी आहे.
म्हणूनच शिक्षक दिन हा केवळ शाळांपुरता मर्यादित उत्सव नसून प्रत्येक समाजघटकाने गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. “विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील स्वप्नांना सत्यात उतरवण्याची ताकद जर कुणात असेल तर ती फक्त शिक्षकातच आहे”, ही जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे.
✍🏻 कार्यकारी संपादक :
रितेश साबळे . 8830708522

Post a Comment
0 Comments