Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

भाजपने सर्वांनाच फसवलेच नाही तर गंडवले आहे! – ॲड. प्रकाश आंबेडकर.



वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻

मनोहर गायकवाड 


मुंबई : मराठा समाजाला आरक्षणाबाबत शासनाने काढलेल्या शासन निर्णयावर (जीआर) सध्या राज्यात तर्क-वितर्क सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज (४ सप्टेंबर) सायंकाळी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट आरोप केला की, भाजपने मराठा समाजाला फसवलेच नाही तर गंडवले आहे.


महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला ‘कुणबी’ संबोधण्याचा जीआर काढून मोठा गाजावाजा केला. भाजपने असा आव आणला की, न सुटणारा प्रश्न त्यांनी सोडवला. मात्र हा निर्णय गंडवणारा आणि दिशाभूल करणारा असल्याची टीका ॲड. आंबेडकर यांनी केली.


पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, “भाजपने मराठा आरक्षणासाठीची नेमलेली शासकीय उपसमिती, न्या. शिंदे समिती, मराठा समाज, मनोज जरांगे पाटील आणि कुणबी समाज – या सर्वांना फसवले आहे.”


ॲड. आंबेडकर यांनी जगन्नाथ डी. होल विरुद्ध महाराष्ट्र राज्य सरकार या प्रकरणातील मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल उद्धृत केला. त्यांनी स्पष्ट केले की, न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, सर्व मराठा समाजाला कुणबी संबोधता येणार नाही. तसेच “कुणबी ही जात नसून व्यवसाय आहे” असेही न्यायालयाने नमूद केले आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयातही टिकला असून, सर्वोच्च न्यायालयाने सर्व मराठे हे कुणबी आहेत असे सरसकट मान्य केलेले नाही. त्यामुळे भाजपने जीआर मार्गे घेतलेला निर्णय चुकीचा आणि दिशाभूल करणारा असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.


ते पुढे म्हणाले, “ओबीसींनी आपल्या हक्कासाठी आता संघर्ष करणे गरजेचे आहे. यासाठी आंदोलन, मोर्चे, बैठका आयोजित कराव्या लागतील आणि ओबीसी मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये दबाव आणणे अत्यावश्यक आहे.”


वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट करताना आंबेडकर म्हणाले की, मराठा आरक्षणाचे आणि ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे. मराठा समाजाचे स्वतंत्र ताट तयार झाले तरच त्यांना आरक्षण मिळू शकते. मात्र शासनाने सर्व मराठे कुणबी समजावेत असा जीआर काढून भाजपने अजित पवार, एकनाथ शिंदे तसेच उबाठा आणि मराठा समाजालाही गंडवले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.



Post a Comment

0 Comments