वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
शंकर गायकवाड
मुरबाड :ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज मुरबाड विधानसभेचे आमदार किसनजी कथोरे यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना जाहीर पाठिंबा दर्शविला. सकाळपासून विविध ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनात समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या ठिकाणी आमदार कथोरे स्वतः उपस्थित राहिले आणि त्यांनी आंदोलनकर्त्यांशी थेट संवाद साधला.
आमदार किसनजी कथोरे यांनी आंदोलनकर्त्यांना उद्देशून म्हटले की,
"ओबीसी समाजाच्या हक्कांचा प्रश्न हा केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून तो सामाजिक न्याय व समतेशी निगडीत आहे. आपल्याला न्याय्य हक्क मिळवण्यासाठी मी नेहमीच खांद्याला खांदा लावून उभा राहीन. ओबीसी आरक्षण हा संविधानिक हक्क आहे, तो हिरावून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही."
त्यांच्या या ठाम भूमिकेने उपस्थितांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला. आंदोलनस्थळी “जय ओबीसी 💪💪💪” अशा घोषणांनी वातावरण दुमदुमले. कार्यकर्त्यांनी आमदार कथोरे यांचे स्वागत करत त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
समाजाच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी एकजूट दाखवणे हेच आंदोलनाचे यश असल्याचे कथोरे यांनी सांगितले. तसेच येणाऱ्या काळात हा लढा अधिक तीव्र होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आजच्या या भेटीमुळे मुरबाड परिसरातील ओबीसी समाजामध्ये उत्साहाचे व आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून आमदारांच्या पाठिंब्यामुळे आंदोलनाला अधिक बळ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.


Post a Comment
0 Comments