वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
शहापूर तालुका प्रतिनिधी शंकर गायकवाड
मुरबाड विधानसभा मतदारसंघातील नांदगाव, मानिवली, ठुणे, पाडाळे या मार्गावरील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, ठुणे गावाजवळील पुलाची स्थितीही अत्यंत धोकादायक झाली असून कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार, प्रवासी वाहनधारक व शालेय मुलांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
स्थानिक नागरिक तसेच या मार्गाने नियमित ये-जा करणारे प्रवासी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करत आहेत. मात्र, अद्यापही कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थ व प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.


Post a Comment
0 Comments