वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
कार्यकारी संपादक रितेश साबळे
सोयगाव तालुका :दिनांक : २० सप्टेंबर २०२५ |
सोयगाव तालुक्यातील निंबायती गावात घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. गावातील मेहनती शेतकरी गजानन हरिबा शेवरे (वय ५५) यांचा सापदंशाने मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गजानन शेवरे हे दिवसभर शेतकाम करून संध्याकाळी गुरांना वैरण टाकण्यासाठी शिवारातील शेडकडे गेले होते. शेडचे दार उघडताच वर लपलेल्या सापाने अचानक त्यांच्या कपाळावर दंश केला. हा प्रकार इतका झपाट्याने घडला की कुटुंबीय घाबरून गेले. त्यांनी तातडीने गजानन शेवरे यांना ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र विष शरीरात जलद पसरल्याने उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
गजानन शेवरे यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबियांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
ग्रामस्थांच्या मते, ग्रामीण भागात अशा प्रकारचे अपघात वारंवार होत असून, शासनाने सर्पदंश प्रतिबंधक जनजागृती मोहीम राबवून शेतकऱ्यांचे प्राण वाचवावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Post a Comment
0 Comments