वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
बुलढाणा जिल्हाप्रमुख शेख हसन .
शेगाव – शहरातील अग्रेसन चौक परिसरात असलेल्या माहेश्वरी भवनाच्या बाजूला गेल्या चार दिवसांपासून कचऱ्याचा प्रचंड ढिगारा साचला असून, नगरपरिषद प्रशासनाचे याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणारे भाविक, स्थानिक नागरिक आणि पायदळी चालणारे प्रवासी मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत.
कचऱ्यामुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरली असून मच्छरांचा त्रास वाढला आहे. विशेष म्हणजे, हा परिसर अत्यंत गर्दीचा असल्याने भाविक, व्यापारी, शालेय मुले आणि नागरिकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. दूषित वातावरणामुळे डेंग्यू, मलेरिया, कॉलरा, गॅस्ट्रो यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, नगरपरिषद स्वच्छतेसाठी दररोज गाड्या पाठवत असल्याचा दावा करते. मात्र प्रत्यक्षात चार दिवसांपासून या भागात कोणतीही स्वच्छता झालेली नाही. त्यामुळे कचरा साचून राहिला असून, सध्या तो डोंगराएवढा झाला आहे.
कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या भाविकांमध्येही तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शेगाव हे संत गजानन महाराजांचे स्थान असल्याने येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यांना स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या पवित्र नगरीत कचऱ्याचा ढिगारा पाहून शहराची प्रतिमा मलिन होत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.
या गंभीर समस्येकडे नगरपरिषद प्रशासनाने तातडीने लक्ष केंद्रित करून कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावावी, परिसराची योग्य प्रकारे स्वच्छता करून फवारणी करावी, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.
फक्त अग्रेसन चौकाच नाही, तर शहरातील अनेक भागात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून, ही परिस्थिती कायम राहिली तर शहरात रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने अशा ठिकाणी नियमित स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे.


Post a Comment
0 Comments