वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
कार्यकारी संपादक रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर/खुलताबाद :
खुलताबाद तालुक्यातील खांडेपिंपळगाव येथे स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यविधी दरम्यान ग्रामस्थांना संतापजनक प्रसंगाला सामोरे जावे लागले. गावातील ज्येष्ठ नागरिक पांडुरंग शहाजी भालेराव (वय ६५) यांचे सोमवारी (१ सप्टेंबर) सकाळी निधन झाले. दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना अचानक पावसाचा जोर वाढला. त्यावेळी सरण विझू नये म्हणून नातेवाईकांना ताडपत्री धरावी लागली, इतकेच नव्हे तर सुमारे १५ लिटर डिझेल टाकून सरण पेटवावे लागले.
मंजुरी मिळाली पण प्रत्यक्ष काम ठप्प
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चार महिन्यांपूर्वी १५ गुंठे गायरान जमिनीची नोंद स्मशानभूमीसाठी झाली होती. ही बाब उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनीही मान्य केली आहे. मात्र आजवर त्या जागेवर कुठलेही काम झालेले नाही. यामुळे ग्रामस्थांना अंत्यसंस्कार करताना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
ग्रामस्थ व कार्यकर्त्यांचा संताप
सामाजिक कार्यकर्ते प्रवीण इंगळे यांनी प्रशासनावर ताशेरे ओढत सांगितले की, “भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. देश महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना आमच्या गावात अजूनही स्मशानभूमी नाही. प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर आम्ही तहसील कार्यालयासमोर अंत्यसंस्कार करून निषेध नोंदवू.”
तर ग्रामपंचायत सदस्य सुभाष भालेराव यांनी खंत व्यक्त केली की, “जागा नोंद झाली आहे; पण प्रत्यक्षात विकासकाम झालेले नाही. त्यामुळे गावकऱ्यांना सतत अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.”
जिल्ह्यातील गंभीर चित्र
खुलताबाद तालुक्यातील ही घटना अपवाद नसून जिल्ह्यातील एक व्यापक समस्या आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १३३२ पैकी तब्बल २३१ गावांना अद्याप स्मशानभूमी उपलब्ध नाही. शिवाय, ३१० गावांना स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नाही. याचा सर्वाधिक फटका भूमिहीन, दलित आणि मागासवर्गीय समाजाला बसतो.
तालुकानिहाय स्मशानभूमी अभाव (निवडक आकडे)
खुलताबाद तालुका : ७४ गावे, त्यापैकी १८ गावांना स्मशानभूमी नाही
गंगापूर : ४५ गावे
कन्नड : ३९ गावे
सिल्लोड : ४२ गावे
पैठण : ३९ गावे
फुलंब्री : १८ गावे
वैजापूर : ११ गावे
सोयगाव : १३ गावे
प्रशासनाला सवाल
एकीकडे केंद्र व राज्य सरकार ग्रामीण विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करत असताना, दुसरीकडे जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये मृत्यूनंतरही सन्मानाने अंत्यसंस्काराची सुविधा नाही, ही बाब धक्कादायक आणि लज्जास्पद आहे. आता प्रशासनाने तातडीने पुढाकार घेऊन या समस्येवर ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.



Post a Comment
0 Comments