वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
{संपादकीय}
कल्याण – कल्याण पूर्वेतील नेतिवली परिसरात नशेखोरांनी उच्छाद मांडल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. रात्री अपरात्री दारे ठोठावणे, घरांच्या खिडक्या फोडणे, रस्त्यावर महिलांना छेडणे, दगडफेक अशा प्रकारांचा सिलसिला सुरु असून रहिवासी अक्षरशः दहशतीत जगत आहेत.
परिस्थिती इतकी गंभीर आहे की, एका घरातील भाडेकरूने मालकच दार ठोठावत आहे याची खात्री करून घेतल्याशिवाय दार उघडण्यास नकार दिला. त्याने मोबाईलवर मालकाला संपर्क साधल्यानंतरच दरवाजा उघडला. या घटनेतून परिसरातील नागरिकांमध्ये नशेखोरांविषयी किती भीतीचे वातावरण आहे हे स्पष्ट झाले.
शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी संदीप माने यांनी याबाबत कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी नशेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. माने यांनी यापूर्वीही तक्रारी दिल्या होत्या; मात्र ठोस कारवाई न झाल्याचा आरोप त्यांनी केला.
डीसीपी अतुल झेंडे यांच्या मोहिमेत काही महिन्यांपूर्वी अनेक नशेखोरांना गजाआड केले गेले होते. त्यावेळी पोलिसांचा प्रभाव जाणवत होता. पण आता पुन्हा नशेखोरांनी डोके वर काढले आहे. दोन दिवसांपूर्वी तर त्यांनी एका घराची विजेची लाइन तोडून ते घर चार दिवस अंधारात ठेवले होते.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करून या नशेखोरांना चाप लावावा, अशी एकमुखी मागणी होत आहे.


Post a Comment
0 Comments