वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
मनोहर गायकवाड
ठाणे – सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ॲट्रॉसिटी ॲक्टला जामीन मिळणार नाही असा स्पष्ट निकाल दिल्यानंतरही ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द बोलणाऱ्या आरोपीला न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरबाड तालुक्यातील तलवळी (बारागाव) येथील राकेश सुदाम थोरात हा तरुण संगमनेरच्या बोटा येथे हॉटेलमध्ये काम करत असताना त्याची ओळख वेटर मुरली संतोष देशमुख याच्याशी झाली. दोघांमध्ये वेळोवेळी फोनवर बोलणे होत असे. ९ सप्टेंबर रोजी मुरली देशमुख याने राकेश याला फोन करून दारूच्या नशेत शिवीगाळ करत घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द बोलले आणि "ॲट्रॉसिटीला घाबरत नाही, काय करायचे ते कर" अशी धमकी दिली.
राकेश थोरात याने हे संपूर्ण संभाषण मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर) युवा अध्यक्ष राजेश गायकवाड यांना पाठवले. यानंतर ठाणे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने, ऍड. भूपेश साटपे, ऍड. निखिल अहिरे, युवा नेते निलेश साटपे, पोलीस पाटील अरुण भोईर, अन्याय अत्याचार समितीचे आण्णा साळवे आणि कुमार थोरात यांनी टोकावडे पोलीस स्टेशनला भेट देऊन तक्रार दाखल केली.
पोलीसांनी तक्रारीची दखल घेऊन आरोपी मुरली संतोष देशमुख याच्यावर बी.एन.एस. कलम 351(2), 352, 353(1)(c), 299, 302 आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्याला अटक करून कल्याण सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १९ सप्टेंबर २०२५ पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गुन्ह्याचा तपास DYSP लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या प्रकरणात भीमसैनिकांनी समाज माध्यमांवर रेकॉर्डिंग न पसरवता संयम राखत कायदेशीर मार्गाने गुन्हा दाखल केला. त्यांच्या या भूमिकेचे कौतुक करत ठाणे पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, मराठा देशमुख समाजाचे नेते मनोहरभाऊ देशमुख यांनीही या घटनेचा निषेध नोंदवून आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


Post a Comment
0 Comments