वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
मोहनजी दिपके
औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : येळी फाटा, जिंतूर–औंढा रोड येथे ओबीसी समाजाच्या वतीने हैदराबाद गॅझेट जीआर रद्द करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र सरकारने ओबीसी समाजाच्या विरोधात हा जीआर काढल्यामुळे तो अन्यायकारक असल्याचे सांगून आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
ओबीसी समाजाचे म्हणणे आहे की, त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणाचा विरोध नाही. परंतु मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असल्यास ते ओबीसी प्रवर्गातून देऊ नये, याला तीव्र विरोध आहे. आज सकाळी ११ वाजल्यापासून दीड तास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव तसेच महिलांनी सहभाग नोंदविला. “एकच पर्व – ओबीसी सर्व” या घोषणांनी परिसर दणाणून गेला. “जीव सोडू पण आमचे आरक्षण सोडणार नाही” असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.
या आंदोलनाचे नियोजन ओबीसी जनमोर्चा हिंगोली जिल्हाध्यक्ष अॅड. रवी शिंदे यांनी केले होते. आंदोलन शांततेत पार पडले असले तरी वाहतुकीची मोठी गैरसोय झाली. आंदोलनादरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी शासनाला इशारा दिला की, जर हा जीआर रद्द केला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या आंदोलनांची उभारणी केली जाईल. तसेच सत्ताधाऱ्यांना मतदानातून उत्तर दिले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
आंदोलनानंतर ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून वाहतूक सुरळीत केली. अनुचित प्रकार घडू नये म्हणून औंढा नागनाथ पोलिसांनी विशेष दक्षता घेत चोख बंदोबस्त ठेवला होता.


Post a Comment
0 Comments