वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
कार्यकारी संपादक रितेश साबळे
सुखापूरी – जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी आज नियोजित दौऱ्यात सुखापूरी गावात प्रवेश न करता गावाच्या बाहेरच ओढ्याजवळून परत फिरल्याने लखमापूरी व सुखापूरी येथील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संगमेश्वर नदीवरील मोठा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला महापूर आला असून लखमापूरी व सुखापूरी या दोन्ही गावांमध्ये अनेक घरांत पाणी शिरले. त्यामुळे अनेक नागरिकांच्या शेतीमालाचे तसेच घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
लखमापूरीचे माजी सरपंच अशोक गोरे यांनी सांगितले की, “पालकमंत्र्यांनी सुखापूरी गावात येऊन प्रत्यक्ष पाहणी करणे गरजेचे होते. परंतु नियोजित दौऱ्यात सुखापूरीचा समावेश असूनही त्या केवळ तीन किलोमीटर अंतरावरून परत गेल्या, हे ग्रामस्थांच्या जिव्हारी लागणारे आहे.”
दरम्यान, रुई येथे तलाव फुटल्यामुळे सुमारे दोनशे एकर शेतीचे नुकसान झाले असून पूरग्रस्त भागात वेळेवर उपचार न मिळाल्याने एका बालकाचा मृत्यू झाला. या ठिकाणीही पालकमंत्र्यांनी भेट न दिल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी अधिकच वाढली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना पूरग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. अशा स्थितीत जालना जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी सुखापूरी दौरा अर्धवट सोडल्याने “दौरा का रद्द केला?” असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.


Post a Comment
0 Comments