वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
मोहनजी दिपके
हिंगोली, औंढा (ना):
मौजे सिद्धेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकूण 231 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या आवारातच विजेचा डीपी (रोहित्र) बसवलेला असून यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
पालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या डीपीवर वारंवार शॉर्टसर्किट होऊन आग लागते तसेच तारा तुटून खाली पडण्याचे प्रकार घडत आहेत. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते. तारा खाली पडल्यास पाण्यातून विद्युत प्रवाह पसरण्याची शक्यता असून गंभीर अपघात होऊ शकतो.
यासंदर्भात ग्रामस्थ व पालकांनी वारंवार महावितरण कार्यालय तसेच ग्रामपंचायतीकडे निवेदने देऊन डीपी शाळेच्या आवारातून अन्यत्र हलविण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. महावितरण विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
अलीकडील ग्रामसभेत सामाजिक कार्यकर्ते अब्दुल हफिज, शरद पोले, हनुमान जयस्वाल, नामदेव गिरी, संजय राठोड, रोहिदास चव्हाण, विराज राठोड, उग्रसेन नवले, पवन ठोके, नामदेव मुकाडे, संजय नवले व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी हा प्रश्न जोरदारपणे उपस्थित केला. सरपंच व ग्रामसेवक यांना धारेवर धरत तातडीने डीपी हलविण्याची मागणी करण्यात आली.
ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, जर त्वरित डीपी हलविण्यात आला नाही आणि कुठलाही अपघात घडला, तर याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायत सिद्धेश्वर व महावितरण कार्यालयाची राहील. पुढील काही दिवसांत ग्रामस्थांच्या वतीने महावितरण कार्यालय व ग्रामपंचायतीविरोधात मोर्चा व आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.


Post a Comment
0 Comments