वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
सोशल मीडिया संपादक मोहनजी दिपके
औंढा नागनाथ (जि. हिंगोली) — सिद्धेश्वर गावातील अनेक घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचे बांधकाम पूर्ण होऊन तीन ते चार महिने उलटूनही अद्यापपर्यंत दुसरा व तिसरा हप्ता वितरित करण्यात आलेला नाही. या विलंबामुळे लाभार्थ्यांना गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
लाभार्थ्यांनी अनेक वेळा पंचायत समिती औंढा नागनाथ येथील अभियंते व संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असला तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. शासनाकडून घरकुलाचा निधी न मिळाल्याने बांधकाम पूर्ण करूनही अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत.
गावकरी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून या प्रकरणात सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून घरकुल संबंधित अभियंत्यांकडून तातडीने तपासणी करून थकीत निधी लाभार्थ्यांना वितरित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य तो निर्णय न घेतल्यास सिद्धेश्वर गावातील लाभार्थी, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.


Post a Comment
0 Comments