वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर (दि. ८ ऑक्टोबर २०२५) — महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत, व पंतप्रधान जन आरोग्य योजना या योजनांमध्ये थॅलेसिमिया मेजर/मायनर या आजारांचा समावेश करून रक्तपुरवठा व बोन मॅरो ट्रान्सप्लांट सारखे अत्यावश्यक उपचार मोफत मिळावेत, तसेच सेम डे डिजिटल मंजुरी प्रणाली राबवून तत्काळ उपचार मिळावेत, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाने निवेदन सादर केले.
हे निवेदन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी मा. डॉ. पारस मंडलेचा व जिल्हा परिषदेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल बेंद्रे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील प्रमुख आरोग्य योजनांत थॅलेसिमिया रुग्णांचा समावेश नसल्यामुळे गरीब व गरजू रुग्णांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. थॅलेसिमिया हा रक्ताशी निगडित आजार असून, अनेक रुग्णांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्याची आवश्यकता भासते. या उपचारासाठी सुमारे २० ते २५ लाख रुपये खर्च येतो, जो सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा नाही. त्यामुळे या आजाराचा समावेश आरोग्य योजनांमध्ये करून सर्व उपचार मोफत करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, आयुष्यमान भारत योजनेच्या संकेतस्थळावर नमूद असलेल्या अनेक रूग्णालयांनी “ही योजना येथे लागू नाही” असे सांगितल्याचे निदर्शनास आले. काही रुग्णालयांचे संपर्क क्रमांक चुकीचे किंवा कालबाह्य असल्याचेही आढळले. परिणामी, रुग्णांना उपचारासाठी नकार देण्याच्या घटना वाढल्या आहेत.
या समस्यांवर तोडगा म्हणून “सेम डे डिजिटल मंजुरी” प्रणाली राबवून सकाळी रुग्णांनी कागदपत्रे सादर केल्यानंतर त्याच दिवशी फाइलची मंजुरी देऊन उपचार सुरू करावेत, अशी ठाम मागणी पक्षाने केली आहे.
या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे पक्ष प्रमुख लोकनेते राजुभाई साबळे, जिल्हा प्रमुख दिनेश गवळे, मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, शहराध्यक्ष रणजीत मनोरे, युवा शहराध्यक्ष अर्शद लखपती, तसेच प्रदीप धनेधर व बाबर खान उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments