वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
पैठण (छत्रपती संभाजीनगर) :
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरण जलाशय शंभर टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेने भरले आहे. वाढलेला पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने मंगळवारी धरणातून जवळपास ३ लाख क्युसेक पाण्याचा विक्रमी विसर्ग सुरू केला.
या विसर्गामुळे पैठण शहरासह नदीकाठच्या १३ गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाणी गावात घुसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करावे लागले असून, आतापर्यंत ८,०७४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. प्रशासनाने शाळा, मंगल कार्यालये आणि अन्य सुरक्षित इमारतींमध्ये निवारा केंद्रे उभारली असून अन्न, पाणी व आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
पूरग्रस्त भागातील शेतजमिनी पाण्याखाली गेल्या असून, घरांनाही मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. नदीकाठच्या अनेक रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतत पूरग्रस्त भागात काम करत असून, मदतकार्य वेगाने सुरू आहे.
राज्याचे पालकमंत्री यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.



Post a Comment
0 Comments