वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
बाळापूर (प्रतिनिधी) : बाळापूर तालुक्यातील खिरपुरी गावातील शुभांगी गणेश वाघमारे (वय १६ वर्षे ६ महिने) या अल्पवयीन मुलीला अंकुश प्रकाश वानखडे याने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेला सुमारे चार महिने उलटून गेले असूनही, मुलगी अद्याप सापडलेली नाही.
शुभांगी ही आपल्या मामाच्या घरी राहत होती. तिच्या अचानक बेपत्ता झाल्यामुळे कुटुंबीयांनी तत्काळ बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. तसेच अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना देखील लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले आहे. मात्र, या सर्व प्रयत्नांनंतरही पोलिस प्रशासनाला अद्याप मुलीचा माग काढण्यात अपयश आले आहे.
तपासात होणाऱ्या विलंबामुळे आणि पोलिसांच्या निष्क्रिय भूमिकेमुळे संतप्त झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी अकोला जिल्हा परिषदेच्या समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. “जोपर्यंत आमच्या मुलीचा शोध लागणार नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण थांबवणार नाही,” असा निर्धार नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, या कुटुंबाला न्याय मिळावा आणि अल्पवयीन शुभांगी वाघमारे हिचा तातडीने शोध लावण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ आणि नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.


Post a Comment
0 Comments