वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
सोशल मीडिया संपादक : मोहनजी दिपके
हिंगोली जिल्हा, दि. 18 ऑक्टोबर – कळमनुरी तालुक्यातील येडशी तांडा येथील भोजाजी नाईक प्राथमिक आश्रम शाळेच्या वस्तीगृहात अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकानेच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या घटनेमुळे शिक्षण विभागात आणि स्थानिक समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सदर घटना 13 ऑक्टोबरच्या रात्री घडली. शिक्षक महालिंग पटवे यांनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीला "जेवायला चल" असे म्हणून कार्यालयात बोलावून नेले आणि नंतर "तू माझ्यासोबत झोपतेस का?" असे म्हणत लज्जास्पद वर्तन केले. विद्यार्थिनीला वाईट उद्देशाने स्पर्श करून तिचा विनयभंग केला.
या प्रकरणी 15 ऑक्टोबर 2025 रोजी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात भा.द.वि., बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी ॲक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी महालिंग पटवे फरार झाला होता. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि उपविभागीय अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथक तयार करण्यात आले. या पथकाने गुरुवारी (दि. 16 ऑक्टोबर) आरोपी पटवे याला अटक केली. त्यापूर्वी वस्तीगृह अधीक्षक मोहन जाधव यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
महिला पोलीस उपनिरीक्षक प्रणिता ढोरे यांच्या पथकाने वस्तीगृहातील काही विद्यार्थिनींचे जबाब नोंदवले असता, बहुतांश मुलींनी घटना घडल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकारामुळे पालक आणि गावकऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला असून, संस्थेच्या प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचे आरोप करण्यात येत आहेत.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता समाज कल्याण विभागाने तातडीने कारवाई करत आश्रम शाळेचे मुख्याध्यापक गुठे, शिक्षक महालिंग पटवे आणि अधीक्षक मोहन जाधव या तिघांना निलंबित केले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश बुधवारी (दि. 15 ऑक्टोबर) जारी करण्यात आले असून, या कारवाईमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.



Post a Comment
0 Comments