वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
सोशल मीडिया संपादक मोहनजी दीपके
दि. 24 ऑक्टोबर 2025, औंढा नागनाथ – देशभरात अनुसूचित जाती-जमातींवर होणाऱ्या अन्यायाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून त्यांना त्यांच्या हक्कांपासून व अधिकारांपासून दूर ठेवले जात आहे. बौद्ध समाजाला समानतेची वागणूक न मिळाल्यामुळे आणि त्यांच्या वस्त्यांमध्ये विकास कामांना दुजोरा न मिळाल्याने, या सर्व अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी औंढा नागनाथ तहसील कार्यालयासमोर रिपब्लिकन नेते दिनेश हनुमंते यांच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनात बौद्ध समाजाच्या विविध मागण्यांचा समावेश असून त्या पुढीलप्रमाणे आहेत —
1. बौद्ध समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र राखीव मतदारसंघ देण्यात यावेत.
2. बौद्धांना दुबार मतदार अधिकार देण्यात यावेत.
3. बौद्धांच्या स्वतंत्र वसाहती निर्माण करण्यात याव्यात.
4. जातीनिहाय जनगणना करण्यात यावी.
5. अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणात वर्गीकरण करू नये.
6. आरक्षणात उपवर्गीकरण करायचे असल्यास प्रथम राजकीय आरक्षणात करावे.
7. हिंगोली जिल्ह्यातील सर्व गावांमधील बौद्धांच्या स्मशानभूमीचे प्रश्न तातडीने सोडवावेत.
8. बौद्ध समाजाच्या ताब्यात असलेल्या सर्व गायरान जमिनी त्यांच्या नावावर करण्यात याव्यात.
या सर्व मागण्यांसाठी दिनेश हनुमंते, वैभव धबडगे, साहेबराव काशीदे, सिद्धार्थ कुऱ्हे आणि सहकाऱ्यांच्या वतीने हे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.
दरम्यान, प्रशासकीय स्तरावरून औंढा नागनाथ येथील नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव व नायब तहसीलदार प्रवीण ऋषी यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन सर्व मागण्या शासन स्तरावर पाठवण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच अन्नत्याग आंदोलन थांबवावे, अशी विनंती करण्यात आली.
मात्र, दिनेश हनुमंते यांनी एवढ्यावर समाधान न मानता आपल्या सर्व मागण्यांवर ठाम राहण्याची भूमिका घेतली असल्याचे समजते.



Post a Comment
0 Comments