वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
शहापूर तालुका प्रतिनिधी शंकरजी गायकवाड
शहापूर (जि. ठाणे) — दिवाळी हा उत्साह, जल्लोष आणि रोषणाईचा सण असला तरी समाजातील असमतोलामुळे ही रोषणाई अजूनही अनेक खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचलेली नाही. शहरांमध्ये लाखो रुपयांचे फटाके उडवले जात असताना, ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही चूल पेटण्याची शाश्वती नसते, हे वास्तव आपल्याला अस्वस्थ करणारे आहे.
याच सामाजिक विषमतेवर उपाय म्हणून आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलवण्याच्या उद्देशाने ‘ध्येय ऐक्याचा समूह’ गेल्या आठ वर्षांपासून ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. या परंपरेचा पुढाकार घेत यावर्षी दिवाळीच्या निमित्ताने शहापूर तालुक्यातील भेकरमाळ (अजनूप शेजारी) येथे समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमांतर्गत गरजूंना आवश्यक किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. तसेच भेकरमाळ अंगणवाडीत शिकणाऱ्या लहान मुलांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून पाण्याचा फिल्टर, त्यासोबतच कपडे, शालोपयोगी वस्तू आणि मिठाईचे वाटप करण्यात आले.
यावेळी पाड्यातील नागरिकांच्या व्यथा, समस्या आणि गरजा जाणून घेण्यात आल्या. तसेच महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याबाबत चर्चा करून वर्षभर करता येणाऱ्या स्थायी उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
या उपक्रमासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आवाहनाला अनेक मित्रमंडळी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांच्या सहकार्याने आणि जमा झालेल्या निधीमुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
ध्येय ऐक्याच्या समूहाने सर्व दानदात्यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, भविष्यातही अशा सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांना सर्वांचे सहकार्य लाभावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.



Post a Comment
0 Comments