वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
ठाणे जिल्हा प्रतिनिधी मनोहरजी गायकवाड .
पुणे : ससेक्स विद्यापीठातून नुकतीच पदवी प्राप्त केलेल्या प्रेम बिऱ्हाडे या दलित तरुणाला लंडनच्या हिथ्रो विमानतळावरील नोकरीची सुवर्णसंधी गमवावी लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुण्यातील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स या महाविद्यालयाने त्याच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांची तपासणी (व्हेरिफिकेशन) करण्यास स्पष्ट नकार दिल्याने ही वेळ आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ (माजी ट्विटर) हँडलवर दिली. त्यांनी या घटनेला “गंभीर जातीय भेदभावाचा प्रकार” असे संबोधत महाविद्यालय प्रशासनावर आणि प्राचार्यांवर तीव्र शब्दात टीका केली आहे.
प्रमाणपत्र तपासणीस नकार — कारण ‘जात’?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम बिऱ्हाडे यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करून प्रमाणपत्र तपासणीसाठी विनंती केली होती. मात्र, महाविद्यालयाकडून त्याची ‘जात’ विचारल्यानंतर तपासणीस नकार देण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे, जेव्हा प्रेम परदेशात शिक्षणासाठी गेला होता, तेव्हा याच महाविद्यालयाने त्याची प्रमाणपत्रे तपासून दिली होती. परंतु आता नोकरीसाठी त्याच प्रक्रियेस नकार देण्यात आला.
प्राचार्यांचा भाजपशी संबंध?
सध्या मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्या डॉ. निवेदिता गजानन एकबोटे आहेत. त्या भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा म्हणूनही कार्यरत असल्याचे समोर आले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या या राजकीय आणि वैचारिक संबंधांवर प्रश्न उपस्थित करत, “मनूवादी भाजपशी असलेल्या प्राचार्यांच्या वैचारिक जवळीकीमुळे त्यांचे निर्णय दलित, आदिवासी आणि ओबीसी विद्यार्थ्यांविरोधात पूर्वग्रहदूषित असण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे म्हटले आहे.
जातीय भेदभावाचे ज्वलंत उदाहरण
प्रेम बिऱ्हाडे हे नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यातील असून, त्यांनी प्रचंड सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून यूकेपर्यंत शिक्षणाचा प्रवास केला. परंतु आता त्यांना केवळ त्यांच्या ‘जाती’मुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरची नोकरी गमवावी लागली, हे खेदजनक असल्याची भावना विविध आंबेडकरी वर्तुळातून व्यक्त होत आहे.
ॲड. आंबेडकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. “प्रेम बिऱ्हाडे यांची कहाणी ही केवळ एका तरुणाची नव्हे, तर जातीय भेदभावामुळे रोज दडपल्या जाणाऱ्या हजारो दलित विद्यार्थ्यांच्या संघर्षाची कहाणी आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
या गंभीर आरोपांवर मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स किंवा प्राचार्या डॉ. निवेदिता गजानन एकबोटे यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.


Post a Comment
0 Comments