वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर — महानगरपालिकेच्या करदात्यांसाठी एक महत्त्वाची आनंदवार्ता आली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने सुरु केलेली “फ्रीडम फ्रॉम पेनल्टी योजना” म्हणजेच मालमत्ता कर सवलत योजना आता ऑक्टोबर २०२५ अखेरपर्यंत वाढविण्यात आली आहे. नागरिकांना विलंब शुल्क व दंडातून सूट देण्यासाठी ही योजना राबवली जात आहे.
महानगरपालिकेच्या माहितीप्रमाणे, कर भरण्याची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मागील काही महिन्यांपासून आर्थिक अडचणींमुळे अनेक करदाते वेळेत कर भरू शकले नव्हते. या योजनेअंतर्गत जर नागरिकांनी ऑक्टोबर अखेरपर्यंत आपला मालमत्ता कर भरला, तर त्यांना विलंब शुल्क, दंड आणि व्याजापासून संपूर्ण सूट मिळणार आहे.
मनपा आयुक्तांनी सांगितले की, या योजनेचा उद्देश म्हणजे नागरिकांना कर भरण्यास प्रवृत्त करणे तसेच मनपाच्या महसुलात वाढ घडवून आणणे हा आहे. शहरातील सर्व वॉर्ड कार्यालयांमध्ये तसेच ऑनलाइन माध्यमातून कर भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, या योजनेचा लाभ घेऊन वेळेत कर भरावा आणि शहराच्या विकासात आपला वाटा उचलावा.


Post a Comment
0 Comments