वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
*कार्यकारी संपादक : रितेश साबळे*
छत्रपती संभाजीनगर, दि. 12 ऑक्टोबर (प्रतिनिधी) —
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील खळेगाव येथील सुरेश जाधव यांनी छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या प्रचंड आर्थिक घोटाळ्यामुळे आत्महत्या केली होती. त्यांच्या न्यायासाठी त्यांची *पत्नी कविता जाधव आणि आई* 29 सप्टेंबरपासून छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस आयुक्तालयासमोर आमरण उपोषणास बसल्या आहेत.
मल्टीस्टेट बँकेने मराठवाड्यातील हजारो ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे. या फसवणुकीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सुरेश जाधव यांनी आत्महत्येचे टोक गाठले. या घटनेनंतर त्यांच्या पत्नी कविता जाधव यांनी न्याय मिळवण्यासाठी ठाम भूमिका घेतली आहे. त्यांनी चार महिन्यांपूर्वी गेवराई पोलिस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली असतानाही, अद्याप गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही किंवा आरोपींना अटक झालेली नाही.
या न्यायलढ्यात कविता जाधव आपल्या सासू आणि लहान मुलांसह पोलीस आयुक्तालयासमोर उपोषण करत असून, त्या प्रशासनाकडून ठोस कारवाईची मागणी करत आहेत.
“आमचा पैसा आम्ही आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नकार्यासाठी साठवला होता. पण या बँकेने गोरगरिबांच्या पैशावर डल्ला मारला. आता न्याय मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही,” असे कविता जाधव यांनी सांगितले.
कविता जाधव यांच्या या लढ्याला स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध राजकीय नेत्यांचे समर्थन मिळत असूनही, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. जनतेतूनही शासनाने लवकरात लवकर या प्रकरणाची दखल घेऊन ठेवीदारांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.


Post a Comment
0 Comments