वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
अकोला – शहरात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. दलित समाजातील एका महिला पदाधिकाऱ्याला हॉटेलमध्ये मुक्कामासाठी रूम नाकारण्यात आल्याने या प्रकरणी अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई प्रदेशातील एका संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्या डॉ. नेहल सोनी या अधिकृत दौऱ्यावर अकोल्यात आल्या होत्या. मुक्कामासाठी त्यांनी स्थानिक रायझिंग सन हॉटेलमध्ये रूम घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या ओळखीविषयी माहिती मिळाल्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने अचानक रूम देण्यास नकार दिला. या वर्तनामुळे अपमानित झाल्याची भावना झाल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे सिव्हिल लाईन पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापक व संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. घटनेनंतर सामाजिक संघटनांनी हॉटेल व्यवस्थापनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, हॉटेल चालकाने आपल्या बाजूने सफाई देत, तांत्रिक कारणांमुळे रूम देता आली नाही असा दावा केला आहे. मात्र, प्राथमिक तपासानुसार भेदभावाचे स्वरूप स्पष्ट दिसत असल्याने पोलिसांनी तपास अधिक गतीने सुरू केला आहे.
ही घटना केवळ एका व्यक्तीचा अपमान नसून, समाजात अजूनही जातीच्या आधारावर भेदभावाचे विष जिवंत असल्याचे तीव्र संकेत यातून मिळतात, असे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे.



Post a Comment
0 Comments