वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️
इगतपुरी (प्रतिनिधी) — मिलिंदराज पंडित .
इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो, पिंपरी सदो, फांगुळगव्हाण, बोरली वाघ्याची वाडी, जांबवाडी, धम्मनगर आणि गावठा बोरली या गावांमध्ये बिबट्यांचा वाढता वावर सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परिसरात घनदाट जंगल असल्याने बिबटे आणि वाघ या दोन्ही प्राण्यांचा वावर गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. वनविभागाच्या माहितीनुसार, सध्या या भागात सुमारे पाच ते सहा बिबटे आणि एक ते दोन पट्टेदार वाघ फिरत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले असून, गावकऱ्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.
वनविभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, बचाव पथक कार्यरत आहे. नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये, तसेच लहान मुलांना एकटे बाहेर खेळू देऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, समृद्धी महामार्गाच्या नांदगाव सदो डंपिंग रोड परिसरात दगडांमध्ये दोन बिबट्याची पिल्ले आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे परिसरात अधिक भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने त्या ठिकाणी गस्त वाढविली आहे.


Post a Comment
0 Comments