वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
शहापूर तालुका प्रतिनिधी : शंकरजी गायकवाड
किन्हवली – दिव्यांग हक्क आणि अधिकारांसाठी तसेच प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी प्रतेज दिव्यांग नागरी सहकारी संस्थेच्या वतीने सोमवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी शहापूर येथे भव्य दिव्यांग रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली पंचायत समिती शिवतीर्थ येथून तहसील कार्यालय शहापूरपर्यंत काढण्यात आली.
रॅलीची सुरुवात शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष जगन्नाथ खारीक यांनी केले. त्यांनी रॅलीची नियमावली स्पष्ट करत दिव्यांगांच्या सर्वसामान्य मागण्यांवर प्रकाश टाकला. शासनाने दिव्यांगांसाठी काही योजना आखल्या असल्या तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामपंचायती, रास्तभाव दुकाने, शिधापत्रिका वाटप विभाग तसेच एस.टी. बस सेवेमध्ये दिव्यांगांसाठी आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आले. दिव्यांगांना विना अट घरकुल योजना, ५% निधी, ५०% घरपट्टी सवलत, एस.टी. बसमध्ये स्वतंत्र बैठक व्यवस्था, व्यवसायासाठी २०० चौ. फुट जागा, रोजगाराच्या संधी, हयातीचे दाखले आणि तलाठी पंचनामा करताना येणाऱ्या अडचणी यांसारख्या मागण्यांवर रॅलीत भर देण्यात आला.
या रॅलीला तालुक्यातील विविध संघटनांसह सामाजिक कार्यकर्ते अशोक इरनक आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला. शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांनी दिव्यांगांच्या मागण्या जिल्हा प्रशासनाकडे मांडण्याचे आश्वासन दिले, तर तहसिलदार यांनी निवेदन स्वीकारून मागण्यांचा गांभीर्याने विचार करून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
रॅलीदरम्यान सहभागींसाठी अल्पोपहार, चहा आणि बिस्कीटची व्यवस्था प्रतेज दिव्यांग नागरी सहकारी संस्था आणि आनंद दिघे प्रतिष्ठानचे संस्थापक सोमनाथ धिर्डे यांनी केली होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संचालक विश्वजित घायवट यांनी केले.
या रॅलीत संस्थेचे पदाधिकारी बाळकृष्ण तारमळे, वासुदेव कातकरी, नाना पवार, मिलिंद विशेष, भालचंद्र शिर्के, अमृता जाधव, राहुल झुंझारराव यांच्यासह तालुक्यातील शेकडो दिव्यांगांनी सहभाग नोंदविला.



Post a Comment
0 Comments