शहापूर दिनांक : 28. 10. 2025(संपादकीय)
एकलव्य दिव्यांग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य याच कडून शहापूर सापगाव मार्गावरील नादुरुस्त रस्ता खड्डे मुक्त, चिखळमुक्त व धुळमुक्त व्हावा त्यावर डांबराचे लेपन करावे यासाठी एकदिवसीय भीक मागो आंदोलन करण्यात येत आहे
आपणांस कळविण्यात अत्यंत खेद होतोय की गेल्या आठ वर्षापासून एम.एस.आर.डी.सी. कडून शहापूर- सापगाव- मुरबाड या रस्त्याचे काम विकास निधी अभावी अडकलेले आहे. या रस्त्यावर धूळ व खड्डे व चिखळ या मध्ये शहापुर चे प्रवासी दिवसेंदिवस या रस्त्यामुळे अपघात दुर्घटनेने बळी पडत आहेत. मागील आठ वर्षापासून विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, संघटनांनी या रस्त्या संबंधित आंदोलने केलेली आहेत. प्रत्येक वेळेला आश्वासने आणि पुढील तारीख देऊन हे काम आजतागायत 8 वर्ष उलटून गेले तरीही झालेले नाही. आत्ताच मागील काही दिवसापूर्वी सापगाव शहापूर रस्ता जनसंघर्ष समितीच्या माध्यमातूनही या रस्त्यावर आंदोलन झाले. यावेळी सप्टेंबर मध्ये रस्त्याचे काम सुरू होईल या कारणाने मा. तहसीलदार साहेब व पोलीस प्रशासन यांच्या मध्यस्थीने तूर्तास आंदोलन थांबवावे असे आश्वासन दिले गेले.मात्र या अश्वासनाव्यतिरिक्त इथे काहीही बदल झालेला नाही. रस्ते विकास महामंडळाकडून अनेक वेळा आमच्याकडे या रस्त्यासाठी हवा तितका पैसा नाही किंवा निधी शिल्लक नाही, निधी उपलब्ध नाही म्हणून हा रस्ता थांबविला आहे असे ऐकण्यात येत आहे.
वारंवार काहीतरी थातूर मातूर कारणे देऊन तर कधीकधी निधी नाही असे कारण देऊन ह्या रस्त्याच्या कामात आठ वर्षे उलटून ही कोणताही प्रतिसाद मिळत नाही. कुठल्याही प्रकारचे खड्डे न भरता डांबरीकरण न करता हा रस्ता आजही शहापूरकरांना अगदी तशाच पद्धतीने त्रास देत आहे. या प्रवासाची सर्वात जास्त झळ ही दिव्यांगांच्या वाहनास होते. सर्वसामान्य ठीक आहे त्यांची त्रास करण्याची क्षमता ही जास्त आहे मात्र दिव्यांग व्यक्ती इथे अत्ता तग धरू शकत नाही या कारणांमुळे आम्हाला रस्ता खूप महत्वाचा आहे. मात्र आमच्या असे निदर्शनात येते की या रस्त्यासाठी रस्त्याच्या डांबरी करणासाठी हवा असणारा निधी हा शासनाकडे उपलब्ध नाही त्यामुळे शासनाला हा रस्ता तयार करताना अडचण निर्माण होत आहे. पैशाअभावी हा रस्ता होत नाही हे निदर्शनात आल्याने एकलव्य दिव्यांग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करण्यासाठी आपल्याला सहकार्य करत आहे.
शहापूर-सापगाव ह्या रस्त्यावर डांबरीकरण व्हावे या साठी गुरुवार दि. 30.10. 2025 रोजी सकाळी 10:00 ते संध्या. 04:00 या वेळेमध्ये शहापूर-सापगाव या रस्त्यावरील ब्रिजच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा रस्ता न अडवता किंवा प्रवाशांना कोणताही प्रकारचा त्रास होणार नाही याची संपूर्ण काळजी घेऊन या रस्त्यावर एक दिवस भीक मागणार आहे. भीक मागून मिळणाऱ्या पैशातून हा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी संस्था प्रयत्नशील आहे व तसा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.
भीक मागून मिळणाऱ्या निधीचा कोणत्याही प्रकारचा गैर व्यवहार होणार नाही तसेच एकलव्य दिव्यांग फाउंडेशन पूर्ण काळजी घेऊन हा निधी शहापूर तालुक्याचे मा. तहसीलदार साहेब यांना सुपूर्द करून तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविला जाईल. याची पूर्ण काळजी घेईल. मा. मुख्यमंत्री महोदय यांनी निधीतून आमच्या शहापूर- सापगाव रस्त्यावर डांबर टाकून आमचा प्रवास सुखकर करावा यासाठी सोबत विनंती पत्रव्यवहार ही यावेळी करण्यात येईल.
अन्न,वस्त्र व निवारा या मूलभूत गरजांसोबतच सुखकर प्रवास हा सुद्धा आमचा एक मूलभूत अधिकार आहे आणि तो रस्ता शासनाकडून होत नाही. निधी अभावी हा रस्ता रखडलेला आहे. मात्र या रस्त्याचा सर्वाधिक त्रास हा आमच्या दिव्यांग, वृद्ध, आजारी व गरोदर माता भगिनींना होत आहे आणि हेच कारण पुढे करून आम्ही रस्त्याच्या बाजूला भीक मागून निधी उपलब्ध व्हावा व रस्ता तयार व्हावा यासाठी msrdc साठी जो निधी हवा आहे त्या मध्ये खारीचा वाटा उचलत आहोत. व या निधीतून आमचा रस्ता सुखकर व्हावा अशी मागणी करणार आहोत. हा सामाजिक बांधिलकी म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. तरीही आपणही आमच्या या छोट्याशा प्रयत्नाला सहकार्य करावे ही विनंती संघटनेने मा. तहसीलदार साहेब व पोलीस उपनिरीक्षक यांना केलेली आहे
आम्ही या निवेदनातून शहापूर तालुक्यातील समस्त सामाजिक-राजकीय कार्यकर्ते, पत्रकार बंधू, आमचे स्नेही या सर्वांना विनंती करतोय की आपणही या सामाजिक कार्यात सहभागी होऊन जास्तीजास्त निधी कसा उभा राहील व आपला रस्ता लवकरात लवकर कसा तयार होईल यासाठी सहकार्य करावे अशी आम्ही संघटनेच्या माध्यमातून विनंती करत आहोत. असे एकलव्य दिव्यांग फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन पांडुरंग पडवळ यांनी पत्रकारांशी बोलतांना नमूद केले.



Post a Comment
0 Comments