वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
ठाणे जिल्हा प्रतिनिधी मनोहरजी गायकवाड
कल्याण प्रतिनिधी — कल्याणच्या मोहने परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात मोठा घोळ समोर आला आहे. या प्रकरणात अवघ्या दोन वर्षांच्या मुलीवर खुनाच्या प्रयत्नाचा (कलम ३०७) गुन्हा दाखल करण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
दोन दिवसांपूर्वी मोहने परिसरात फटाके फोडण्यावरून दोन गटात वाद झाला. या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले, ज्यात काही महिला जखमी झाल्या. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही गटांतील सुमारे २५ ते ३० जणांवर गुन्हे दाखल केले. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे आरोपींच्या यादीत एका दोन वर्षांच्या बालिकेचे नावदेखील समाविष्ट झाले आहे.
या निष्पाप चिमुरडीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी “आमच्या चिमुरडीचं नाव गुन्ह्यातून वगळा, आम्हाला न्याय द्या,” अशी मागणी केली आहे.
मुलीच्या आईची वेदनादायक प्रतिक्रिया
या प्रकरणावर बालिकेची आई संजना अविनाश कसबे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले,
> “दोन दिवसांपूर्वी फटाक्यांच्या स्टॉलवर भांडण झाले होते. त्याच वेळी काही लोकांनी आमच्या एरियात येऊन दगडफेक केली, ज्यात आमच्या काही महिलांना दुखापत झाली. आम्ही पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली आणि उपचार घेतले. मात्र दुसऱ्या दिवशी आम्हाला कळाले की माझ्या दोन वर्षांच्या मुलीवरच ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी माझ्या मुलीचं वय सुद्धा पाहिलं नाही! आम्हाला न्याय हवा आहे,” असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला.
पोलिसांचं स्पष्टीकरण
या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितले की, तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक गुन्हा नोंदविण्यात आला असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
या घटनेमुळे पोलिसांच्या निष्काळजीपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दोन वर्षांच्या निरागस चिमुरडीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणं म्हणजे प्रशासनाच्या जबाबदारीवरच प्रश्न निर्माण करणारी बाब ठरत आहे.


Post a Comment
0 Comments