वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
सोशल मीडिया संपादक मोहनजी दिपके .
हिंगोली (जिमाका), दि. १८ ऑक्टोबर — हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, एकूण १७८ कोटी रुपयांच्या निधीला डीबीटी प्रणालीद्वारे वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
यापैकी आतापर्यंत १ लाख ८२ हजार ४९८ शेतकऱ्यांच्या खात्यात १४१ कोटी १५ लाख ३ हजार ३३९ रुपये थेट जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.
जून ते ऑगस्ट २०२५ दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीसाठी शासनाने हिंगोली जिल्ह्यासाठी २३१ कोटी २७ लाख ९२ हजार ३३५ रुपयांची मदत मंजूर केली आहे. त्यापैकी २ लाख ३३ हजार ४ शेतकऱ्यांसाठी १७८ कोटी रुपयांच्या अनुदानाला डीबीटीद्वारे वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
तहसीलनिहाय वितरित निधी पुढीलप्रमाणे आहे :
औंढा नागनाथ तालुका – ३३,०४९ शेतकरी : ₹२६ कोटी ९५ लाख २१ हजार ३२२
वसमत तालुका – ४३,९१५ शेतकरी : ₹२८ कोटी २८ लाख ३४ हजार ०७८
हिंगोली तालुका – ३२,६३८ शेतकरी : ₹२५ कोटी ९६ लाख १९ हजार १४२
कळमनुरी तालुका – ३५,२५८ शेतकरी : ₹३० कोटी ७७ लाख ५६ हजार ९१६
सेनगाव तालुका – ३७,६३८ शेतकरी : ₹२९ कोटी १७ लाख ७१ हजार ८८१
दरम्यान, ई-केवायसी प्रलंबित असलेल्या ४८ हजार ५३९ शेतकऱ्यांना ₹३४ कोटी ८९ लाख ३ हजार ८६१ रुपयांचे अनुदान नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लवकरच वितरित करण्यात येणार आहे. प्रशासनाचा प्रयत्न हा निधी दिवाळीपूर्वीच जमा करण्याचा असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले.
राज्य शासनाने सर्व शेतकऱ्यांसाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही नोंदणी पूर्ण केली आहे, त्यांच्याच खात्यावर थेट अनुदान जमा होत आहे. त्यामुळे अजूनही नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अॅग्रीस्टॅक नोंदणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.



Post a Comment
0 Comments