वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
कार्यकारी संपादक रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः कपाशी, सोयाबीन आणि तूर या पिकांवर नैसर्गिक आपत्तीचा गंभीर परिणाम झाला आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये सलग व अवेळी पावसामुळे शेतातील पिके सडून गेली, तर काही ठिकाणी जमिनीवर पाणी साचल्याने पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. कृषी विभागाकडून मिळालेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, ५४,९८ हेक्टर क्षेत्रावरील कपाशी पिकांचे नुकसान झाले असून तब्बल ७,७८७ शेतकरी या आपत्तीमुळे प्रभावित झाले आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी पिकांच्या वाढीसाठी घेतलेले कर्ज आता डोक्यावर ओझं बनलं आहे. उत्पादन खर्च वाढला असून उत्पन्न जवळपास शून्य झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
शेतकरी संघटनांनी शासनाकडे तातडीने नुकसानभरपाई व सर्वसमावेशक कर्जमाफीची मागणी केली आहे. स्थानिक पातळीवर कृषी अधिकारी व तहसील प्रशासनाकडून पंचनामे सुरू असून, जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात शासनाला सविस्तर अहवाल पाठविला आहे.
दरम्यान, स्थानिक बाजारपेठांमध्ये कपाशीचे दर घसरले असून, उत्पादन घटल्यामुळे कापूस उद्योगालाही मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे.



Post a Comment
0 Comments