Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

ग्रामपंचायत नांदापूर येथील ग्रामसेवक व सरपंच यांच्याविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचा धरणे आंदोलनाचा इशारा!



वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️

सोशल मीडिया संपादक मोहनजी दिपके

कळमनुरी (प्रतिनिधी) —

दि. 27 ऑक्टोबर 2025 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंचायत समिती कार्यालय कळमनुरी येथे मा. गटविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत नांदापूर येथील ग्रामसेवक आर. बी. घुगे व सरपंच यांच्या विरोधात लेखी तक्रार देण्यात आली.


तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, दलित वस्तीतील बौद्ध विहार समोरील नाली, रस्ता व विहिरींच्या उंची वाढविण्याचे काम मागील पाच वर्षांपासून रखडले आहे. या कामाबाबत ग्रामसेवक व सरपंच यांना वारंवार लेखी अर्ज देऊनही काहीच कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या कालावधीत दलित वस्ती विकासाच्या निधीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.


वंचित बहुजन आघाडीने 25 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत नांदापूर येथे लेखी निवेदन दिले होते. तथापि, आजपर्यंत त्या निवेदनावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. अर्जावर उडवाउडवीची उत्तरे देऊन ग्रामसेवक व सरपंच यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बौद्ध विहार समोरील नाल्या, रस्ते आणि विहिरींची उंची वाढविणे ही गरज दलित वस्तीतील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची आहे, असे आघाडीने स्पष्ट केले.


तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, सन 2021 ते 2025 या काळात 15व्या वित्त आयोगांतर्गत दलित वस्तीकरिता राखीव असलेला 22% निधी केवळ दोन कामांसाठी वापरला गेला – करडगिरी येथील नाली व कैलास पांनगे यांच्या घरासमोरील रस्ता – आणि उर्वरित निधीचा वापर कुठे झाला याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


तसेच, माहिती अधिकार कायद्यांतर्गत 25 सप्टेंबर 2025 रोजी मागविलेली दलित वस्ती विकासकामांची माहिती ग्रामसेवक आर. बी. घुगे यांनी अद्याप दिलेली नाही. माहिती अधिकार कायद्यानुसार 30 दिवसांच्या आत माहिती देणे बंधनकारक असून, या प्रकरणात त्यांनी कायद्याचे उल्लंघन केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


या सर्व मागण्यांकडे तात्काळ लक्ष देऊन पुढील पाच दिवसांत उपाययोजना न झाल्यास दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती कार्यालय कळमनुरी समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असेही नमूद करण्यात आले आहे.


या वेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजूभाऊ कांबळे, युवा सचिव जयभीम डोंगरे, शाखा सचिव दादाराव खंदारे, शहर सहसचिव दिनेश पाईकराव, कार्यकर्ता बंटी धनवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments