वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
नागपूर – कफ सिरपमुळे झालेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नागपूरमध्ये तब्बल १४ लहान मुलांचा जीव गेला असून, या औषधांमध्ये जीवघेण्या रसायनांचा समावेश असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या कफ सिरपच्या बाटल्या स्थानिक बाजारात सहज उपलब्ध होत्या. अनेक वैद्यकीय दुकानांमधून ही औषधे विकली जात होती. या सिरपमुळे मुलांच्या शरीरात विषारी द्रव्यांचे प्रमाण वाढल्याने अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
आरोग्य विभागाने तात्काळ सर्व मेडिकलमध्ये कफ सिरप विक्रीवर बंदी घातली आहे. संबंधित औषध उत्पादक कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, तपास वेगाने सुरू आहे.
या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. अशा घातक औषधांची विक्री बाजारात आलीच कशी, हा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारने औषध तपासणी यंत्रणेमध्ये मोठे दुर्लक्ष केले का, असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.
बालकांच्या मृत्यूमुळे पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संबंधितांना कठोर शिक्षा मिळावी आणि अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत, अशी सर्वत्र मागणी होत आहे.


Post a Comment
0 Comments