Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

क्रीडांगण विकास निधीचा अपहार — अण्णा साळवे यांचा प्रशासनाला इशारा : कारवाई न झाल्यास आमरण उपोषण!



वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻

शहापूर तालुका प्रतिनिधी : शंकरजी गायकवाड

मुरबाड / शहापूर — सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात शासनाने आदिवासी आश्रमशाळांसाठी क्रीडांगण विकास योजनेअंतर्गत ७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र प्रत्यक्षात कोणतेही काम न होता, केवळ कागदोपत्री दाखले व बनावट बिले तयार करून निधीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर व अपहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.


मुरबाड व शहापूर तालुक्यातील मोरोशी, खुटल (बारागाव), सासणे (कचकोली), टाकीपठार, पेंधरघोळ, शेणवे आणि शिरोळ या आदिवासी आश्रमशाळांमध्ये मैदान विकासाचे कोणतेही काम न झाल्याचे समोर आले असून, संबंधित ठिकाणी निधी फक्त कागदावर दाखवण्यात आल्याचे उघड झाले आहे.


या संदर्भात अन्याय अत्याचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्याचे जिल्हाध्यक्ष अण्णा साळवे यांनी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, शहापूर येथे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी संबंधित मुख्याध्यापक व प्राचार्य यांच्यावर चौकशी करून शासनाचा निधी १८ टक्के व्याजासह परत वसूल करण्याची आणि दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.


अण्णा साळवे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर प्रकल्प अधिकाऱ्यांनी या गंभीर भ्रष्टाचार प्रकरणात तातडीने व ठोस कारवाई केली नाही, तर ही बाब आदिवासी विकास विभाग तसेच आदिवासी विकास मंत्री यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे मांडली जाईल. तसेच, जर चौकशी प्रक्रियेत विलंब केला गेला किंवा प्रकरण दुर्लक्षित केले गेले, तर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, शहापूर येथे आमरण उपोषण करण्यात येईल, असा तीव्र इशारा त्यांनी दिला आहे.


“आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कांवर डाका टाकणाऱ्यांना सोडणार नाही. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा साळवे यांनी दिला आहे.


या प्रकरणामुळे प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली असून, भ्रष्टाचारात सामील अधिकाऱ्यांवर आणि संबंधित शाळांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. आता प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 


Post a Comment

0 Comments