वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
कार्यकारी संपादक रितेश साबळे
पुणे – पुण्यातील गाजलेल्या कोथरूड प्रकरणात न्यायालयाने दिलेला निकाल हा न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास दृढ करणारा ठरला आहे. औरंगाबादमधून आलेल्या काही पोलिसांनी पुण्यातील तरुणींच्या घरात घुसून मारहाण केली तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप होता. या गंभीर प्रकरणात ७ ते ८ आरोपी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पुणे न्यायालयाने दिले आहेत.
या निर्णयामुळे न्यायासाठी झगडणाऱ्या पीडित तरुणींना दिलासा मिळाला असून हा निकाल अत्यंत स्वागतार्ह असल्याची भावना वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कायद्याचे रक्षक असलेले काही पोलिस जेव्हा राजकीय दबावाखाली वागतात, तेव्हा कायदा त्यांनाही धडा शिकवू शकतो, हे या निर्णयातून स्पष्ट झाले आहे.
राज्यातील गृहखात्याच्या भूमिकेवरही या घटनेनंतर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परभणीतील शहीद सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणातही पोलिसांच्या कारवाईवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देत आरोपी पोलिसांवर गुन्हे दाखल करायला भाग पाडले होते.
कोथरूड प्रकरणातही तसाच संघर्ष झाला. पीडित तरुणींना न्याय मिळवण्यासाठी पहाटेपर्यंत पोलिस ठाण्याच्या दारात ठाण मांडून गुन्हा नोंदवून घेण्यासाठी लढा द्यावा लागला. अखेर वंचित बहुजन आघाडीच्या वकिलांच्या टीमने न्यायालयात युक्तिवाद करत आरोपी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात यश मिळवले.
न्यायालयाने या प्रकरणाचा तपास अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत करण्याचे आदेश देत ACP दर्जाच्या अधिकाऱ्याकडे तपास सोपविण्याचे निर्देश दिले आहेत.
या न्यायलढ्यात सहभागी झालेल्या सर्व वकील, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी अभिनंदन केले असून त्यांनी सांगितले की — “वंचित बहुजन आघाडीचा न्यायासाठीचा लढा कायम सुरू राहील. हा निर्णय सत्य, संविधान आणि न्याय यांचा विजय आहे.”



Post a Comment
0 Comments