वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगरच्या चिकाळथाणा एमआयडीसी भागात शहर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री केलेल्या संयुक्त कारवाईत एक बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर उद्ध्वस्त करण्यात आले. अमेरिकेतील नागरिकांना फसवणूक करून हजारो डॉलर उकळणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी तब्बल ११६ जणांना ताब्यात घेतले.
स्थानिक पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोपनीय पातळीवर काही दिवसांपासून या कॉल सेंटरवर नजर ठेवण्यात येत होती. संशयितांनी अमेरिकन नागरिकांना "टेक सपोर्ट", "टॅक्स पेमेंट" आणि विविध भुलथापांद्वारे पैशांची उकळणी केली जात होती. या ठिकाणी लॅपटॉप, सर्व्हर सिस्टीम, व्हॉईप कॉलिंग सॉफ्टवेअर यांचा वापर करून पूर्णपणे परदेशी कॉल सेंटरचा आभास निर्माण केला होता.
कारवाईदरम्यान कार्यालयातील प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र केबिन, स्क्रिप्टनुसार बोलण्यासाठी मार्गदर्शक पत्रके, तसेच विदेशी नंबरवरून कॉल्स करण्यासाठी विशेष इंटरनेट लाईन्स उपलब्ध असल्याचे पोलिसांना आढळले. या सर्व उपकरणांची जप्ती करण्यात आली असून त्याची किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत अटक करण्यात आलेल्या अनेक जणांना या कॉल सेंटरमध्ये "मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह" किंवा "कस्टमर सपोर्ट" अशा नावांवर नोकरी देण्यात आली होती. त्यामध्ये विद्यार्थी तसेच बेरोजगार युवकही असल्याचे समजते. या रॅकेटचा मास्टरमाइंड कोण आहे, याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील फसवणूक करणाऱ्या टोळीवर पोलिसांची ही मोठी कारवाई ठरली आहे. पुढील तपास गुन्हे शाखेकडून वेगाने सुरू असून आर्थिक व्यवहारांची नोंद व डिजिटल पुराव्यांचे विश्लेषण करण्यात येत आहे.


Post a Comment
0 Comments