वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️
ठाणे जिल्हा प्रतिनिधी : मनोहर गायकवाड
भिवंडी : वंचित बहुजन आघाडी (VBA) भिवंडी शहर शाखेतर्फे आयोजित भव्य पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. शहरातील बहुजन, आदिवासी, अल्पसंख्याक समाजातील तरुण, महिला तसेच विविध विभागांतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या सोहळ्याला VBAच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वंचित बहुजन आघाडीचे भिवंडी शहराध्यक्ष प्रदीप शिर्के यांनी भूषवले.
कार्यक्रमातील सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे भिवंडीतील विविध प्रभागांतून आलेल्या रिपब्लिकन सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर वंचित बहुजन आघाडीत प्रवेश. संविधाननिष्ठ, सर्वसमावेशक व बहुजनहितवादी धोरणांवर विश्वास ठेवून त्यांनी VBAमध्ये प्रवेश केला. या नव्या शक्तिवर्धनामुळे भिवंडीत VBAची संघटनात्मक ताकद अधिक वाढेल, असा विश्वास पदाधिकारी व उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना संविधान मूल्यांवर आधारित राजकीय लढ्याची गरज अधोरेखित केली. “वंचित, बहुजन आणि शोषितांसाठी संविधानिक हक्कांच्या लढ्याला अधिक बळ द्यावे,” असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते रुपेशजी हुंबरे, नूर मोहम्मद खान, आकाश गायकवाड, भगवानजी बचुटे, उमेश घोडके, तानाजी अंदुरे, प्रल्हाद गायकवाड, मिरेश उजगरे, आशा पाटील यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
भिवंडीत झालेल्या या भव्य पक्षप्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीचा जनाधार लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकांमध्ये VBA निर्णायक भूमिका बजावेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.



Post a Comment
0 Comments