वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
सोशल मीडिया संपादक मोहन दिपके
हिंगोली :
महाराष्ट्रातील महार वतनी, इनामी आणि गायरान जमिनी बळकावण्याच्या कथित गैरकारभारांवरून राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापले आहे. या गंभीर प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, यासाठी हिंगोली येथील भीमशक्ती सामाजिक संघटनेने खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशानुसार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे दाद मागितली आहे.
मुंढवा प्रकरणामुळे ताण वाढला
निवेदनात, पुण्यातील मुंढवा परिसरातील सुमारे ४० एकर महार वतनाची जमीन बेकायदेशीरपणे खरेदी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेल्या एका खासगी कंपनीने घेतल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या प्रकरणामुळे धनदांडग्यांकडून महार जमिनी बळकावण्याचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली जमीन
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि ब्रिटिश काळात शौर्य गाजवलेल्या अनुसूचित जातीतील सैनिकांच्या कुटुंबांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी या जमिनी बक्षीसस्वरूप देण्यात आल्या होत्या. अनेक पिढ्यांपासून या जमिनींवर शेती करून SC समाजाचा उदरनिर्वाह सुरू होता.
‘गैरकायदेशीर मार्गाने जमिनी बळकावल्या’
संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुलदीपके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पंतप्रधानांना सादर केलेल्या निवेदनात, मागील २० वर्षांपासून धनदांडग्यांकडून ब्लॅकमेलिंग, बळजबरी, अत्याचार तसेच खूनापर्यंत जाऊन या जमिनी हडपल्याचा आरोप केला आहे. या कारवाया थांबवण्यासाठी केंद्राने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
प्रमुख मागण्या
1. राज्यातील सर्व धनदांडग्यांवर आणि राजकीय प्रस्थापितांवर महार वतनी जमिनी हडपल्याबद्दल कठोर कारवाई करावी.
2. मागासवर्गीय आणि आदिवासी समाजाच्या लाटलेल्या लाखो एकर जमिनी मूळ मालकांना परत करण्याचे आदेश द्यावेत.
या निवेदनावर प्रमोद कुलदीपके, विशाल इंगोले (युवा जिल्हाध्यक्ष), ज्योतीताई धुळे (महिला जिल्हाध्यक्ष), मिलिंद उबाळे, दिनेशजी हनुमंते, काशिनाथ गायकवाड, भीमा कांबळे, दीक्षानंद साळवे आणि संध्याताई केदारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Post a Comment
0 Comments