मुंबई :
मागील आठ दिवसांत एन.डी.एम.जे (नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस) संघटनेची डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक डॉ. सुनील वारे यांच्यासोबत दुसरी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीसाठी डॉ. सुनील वारे यांच्यासह डॉ. बबन जोगदंड आणि सुमेध थोरात उपस्थित होते. तर एन.डी.एम.जे संघटनेतर्फे राज्य सचिव वैभव गिते, राज्य संघटक पंचशीलाताई कुंभारकर, ऍड. नवनाथ भागवत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बैठक क्रमांक २ मध्ये संघटनेच्या प्रमुख मागण्यांवर विस्तृत व रचनात्मक चर्चा करण्यात आली. यात खालील महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले:
1. भारतीय संविधानाच्या 25 लाख प्रती वितरित करण्याची मागणी
6 डिसेंबर चैत्यभूमी (मुंबई), 25 डिसेंबर देहूरोड आणि 1 जानेवारी भीमा कोरेगाव येथे भारतीय संविधानाच्या प्रती शासकीय दरात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करण्यात याव्यात तसेच प्रतींची कमतरता जाणवू नये, याची विशेष काळजी घ्यावी.
2. महापुरुषांचे साहित्य शासकीय दरात उपलब्ध करण्याचा निर्णय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्व प्रकाशित खंड, संविधान सभेतील चर्चासत्रे, महात्मा फुले समग्र वांग्मय, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्या, लहुजी साळवे यांचे चरित्र, बुद्ध आणि त्यांचा धम्म, तसेच मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता या वृत्तपत्रांचे सर्व खंड—ही सर्व पुस्तके बार्टीच्या स्टॉलवर शासकीय दरात उपलब्ध व्हावीत, अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली.
3. संविधान अमृतमहोत्सवाचे कार्यक्रम जिल्हास्तरावर साजरे करावेत
संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात शासकीय पातळीवर कार्यक्रमांचे आयोजन करण्याची सूचना देण्यात आली.
4. भीमा कोरेगाव 1 जानेवारी कार्यक्रमासाठी उत्तम सोई-सुविधा
1 जानेवारीला भीमा कोरेगावला लाखो अनुयायी उपस्थित राहतात. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांसाठी सर्व आवश्यक सोयीसुविधांची भक्कम व्यवस्था करण्याची मागणी संघटनेने केली.
बैठकीत मांडलेल्या सर्व मागण्यांवर सखोल चर्चा झाली असून, आंबेडकरी अनुयायांना संविधानाच्या प्रती व महापुरुषांच्या साहित्याची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन बार्टीचे महासंचालक डॉ. सुनील वारे यांनी दिले.
🔹 एन.डी.एम.जे संघटनेच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने अनुयायांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.




Post a Comment
0 Comments