वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
सोशल मीडिया संपादक मोहन दिपके
हिंगोली जिल्ह्यात केंद्र शासनाच्या आधारभूत दरानुसार सुरू असलेल्या मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांनी कोणत्याही दलालांच्या किंवा मध्यस्थांच्या अमिषाला बळी पडू नये, असे स्पष्ट आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि एनसीसीएफ यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
बैठकीस पणन महासंघाचे कुंडलीक शेवाळे, कृषी पणन मंडळाचे दिगंबर शिंदे, वखार महामंडळ, सीसीआय अधिकारी तसेच जिल्ह्यातील एकूण ७ महासंघाची आणि ११ कृषी पणनच्या खरेदी केंद्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
खरेदी प्रक्रिया सुरू – शेतकऱ्यांनी नोंदणी आवर्जून करावी
हंगाम 2025-26 साठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी ई-समयमुक्ती अॅपवर शेतकरी नोंदणी 30 ऑक्टोबरपासून सुरू आहे. पणन महासंघामार्फत ७ खरेदी केंद्रांवर 15 नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदी सुरू करण्यात आली असून कृषी पणन मंडळाची खरेदी देखील 2–3 दिवसांत सुरू होणार आहे.
जिल्हाधिकारी गुप्ता यांनी शेतकऱ्यांना स्वतःच नोंदणी करण्याचे, दलालांमार्फत नोंदणी अथवा व्यवहार टाळण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांचे पैसे आधार लिंक बँक खात्यावर साधारणपणे तीन दिवसांत जमा होतील, असेही ते म्हणाले.
ज्येष्ठ शेतकऱ्यांसाठी सवलत
ज्येष्ठ शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. ते आपल्या कुटुंबातील सदस्याला प्रतिनिधी म्हणून नियुक्त करू शकतात.
आधारभूत दर
मुग : 8768 रुपये प्रति क्विंटल
उडीद : 7800 रुपये प्रति क्विंटल
सोयाबीन : 5328 रुपये प्रति क्विंटल
शेतमालाचा एफएक्यू (सरासरी) दर्जा अनिवार्य
सोयाबीनसाठी शासनाने ठरवलेले निकष —
माती, काडी, कचरा : 2%
चिमलेले, अपरिपक्व, रंगहीन : 5%
कीड लागलेले : 3%
मशीनने तुटलेले/भेगा पडलेले : 15%
ओलावा : 12%
शेतकऱ्यांनी आपल्या गावाजवळील एनसीसीएफच्या केंद्रावर जाऊन किंवा ई-समयमुक्ती अॅपवरून नोंदणी करावी. नोंदणीसाठी ई-पिक पाहणी केलेला सातबारा, आधारकार्ड आणि बँक पासबुक आवश्यक आहे. पॉस मशीनद्वारे नोंदणी होत असल्याने केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक आहे.
एसएमएस प्राप्त झाल्यानंतरच शेतमाल खरेदी केंद्रावर आणावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच वखार महामंडळाला साठवणुकीसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. कापूस खरेदीचाही स्वतंत्र आढावा घेण्यात आला.


Post a Comment
0 Comments