वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
सोशल मीडिया संपादक मोहन दिपके
७ नोव्हेंबर २०२५ हा दिवस महाराष्ट्रासह देशभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी विशेष महत्त्वाचा. भारतीय संविधानाचे शिल्पकार, ज्ञानाचे प्रतीक, आधुनिक भारताला दिशादर्शक ठरलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळेतील पहिल्या प्रवेशदिनानिमित्त हा दिवस राज्यभर ‘विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा केला जातो.
इ.स. १९०० रोजी सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूल (माजी गव्हर्नमेंट हायस्कूल) येथे लहान ‘भिवा रामजी आंबेडकर’ यांनी प्रथम इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला. शाळेतील रजिस्टरमध्ये १९१४ क्रमांकासमोरील त्या ऐतिहासिक स्वाक्षरीचा दस्तऐवज आजही जतन केलेला आहे. प्रतिकूल परिस्थिती, जातीय बंधने आणि गरिबीचा सामना करत त्यांनी शिक्षणाचे अपार महत्त्व ओळखले. वाचन, अभ्यास आणि जिज्ञासा यांच्या बळावरच त्यांनी जगाला न्याय, समता, बंधुता आणि स्वातंत्र्य या मूल्यांची नवचेतना दिली.
महाराष्ट्र शासनाने २७ ऑक्टोबर २०१७ रोजी अधिकृत निर्णय घेत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी प्रोत्साहन निर्माण करण्याच्या हेतूने ७ नोव्हेंबर हा ‘विद्यार्थी दिन’ घोषित केला. या दिवशी राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये निबंध, वक्तृत्व, काव्यवाचन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
डॉ. आंबेडकर शिक्षणाला मानवी उन्नतीचे एकमेव साधन मानत. त्यांची पुस्तके, त्यांचे वाचनप्रेम आणि ज्ञानार्जनाची अखंड तळमळ यामुळेच ‘राजगृह’ हे त्यांचे ग्रंथनिवास ज्ञानाच्या मंदिराप्रमाणे उभे राहिले. विश्वस्तरीय विद्वत्ता असूनही त्यांनी स्वतःला ‘आजीवन विद्यार्थी’ म्हटले. त्यांच्या संघर्षमय प्रवासातून आधुनिक विद्यार्थ्यांना जिद्द, आत्मविश्वास आणि यशस्वी भविष्यासाठी दिशा मिळते.
आजचा विद्यार्थी हा उद्याचा राष्ट्रनिर्माता, आणि म्हणूनच त्याने प्रामाणिक, जबाबदार, कर्तव्यदक्ष आणि देशहिताच्या मूल्यांनी प्रेरित असणे आवश्यक असल्याचे डॉ. आंबेडकरांनी स्पष्टपणे अधोरेखित केले. “मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय” हा त्यांचा संदेश देशप्रेमाची सर्वोच्च शिकवण देणारा आहे.
महाराष्ट्र शासनाने याच दिवशी वंदे मातरम गीताच्या १५० वर्षांच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून, विद्यार्थी दिन प्रभावीपणे साजरा करण्याची जबाबदारी शिवफुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांवर अधोरेखित केली आहे.
या विद्यार्थी दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला, ज्ञानपरंपरेला आणि प्रेरणादायी विचारांना कोटी कोटी विनम्र अभिवादन.
———————————————
मा. वैभव तानाजी गिते
राज्य सचिव, नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस
निमंत्रित सदस्य, जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती, पुणे
मो. 8484849480
———————————————



Post a Comment
0 Comments