वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
किन्हवाली प्रतिनिधी बाळकृष्ण सोनावणे
तालुका शहापूर, जिल्हा ठाणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरोली (सो) येथे विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळेतील पहिल्या प्रवेशदिनाच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून घोषित केला आहे. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. शाळेचे मुख्याध्यापक डॉ. गंगाराम ढमके यांनी गीताच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेबांना मानवंदना अर्पण केली. कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन सहशिक्षक श्री. यशवंतराव गुरुजी यांनी केले.
या कार्यक्रमास सावरोली (सो) ग्रुप ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष तसेच वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज शहापूर तालुकाप्रमुख श्री. शंकर गायकवाड यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच आदिवासी संघटनेचे युवा नेतृत्व श्री. राजेश वाघ हेही या कार्यक्रमास उपस्थित होते.
मुख्याध्यापक डॉ. ढमके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शालेय जीवनापासून ते भारतीय राज्यघटना निर्मितीपर्यंतचा जीवनप्रवास विद्यार्थ्यांना सविस्तर समजावून सांगितला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय वाढावी यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण घोषणाही केली.
“प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी दर महिन्याला एक नवीन पुस्तक आले पाहिजे. ते वाचून व्यवस्थित जतन करावे. एक वर्षानंतर विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन या उपक्रमाची पाहणी केली जाईल आणि वाचन परंपरा जपणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्यावतीने विशेष गौरव करण्यात येईल,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. यशवंतराव गुरुजी यांनी केले आणि कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.




Post a Comment
0 Comments