वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
सोशल मीडिया संपादक मोहन दिपके
डोंबिवली, मानपाडा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून वेगळे करून २७ गावांना स्वतंत्र नगरपालिका व्हावी, या प्रमुख मागणीसाठी संघर्ष समितीच्या वतीने मानपाडा, डोंबिवली पूर्व येथे आंदोलन सभेचे आयोजन करण्यात आले. स्थानिक नागरिक, भूमिपुत्र समाजबांधव व विविध सामाजिक संघटनांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले.
सभेत झालेल्या चर्चेनुसार, संघर्ष समितीच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लवकरच भेट होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मुख्यमंत्री पातळीवरील या भेटीत २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीसंबंधी निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
लोकनेते दि.बा. पाटील नामांतर प्रकरणाचा संदर्भ
सभेत लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नामांतरासंदर्भातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वादग्रस्त प्रकरणाचाही उल्लेख करण्यात आला. भूमिपुत्रांसह अनेक जबाबदार नेत्यांनी याआधी मुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यानंतरही विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव मिळाले नाही. त्यामुळे भूमिपुत्र समाजात नाराजी असून, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये त्याचे । पडसाद तीन जिल्ह्यांत उमटू शकतात, अशी भावना सभेत व्यक्त झाली.
२७ गावांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री भेटीत काय साध्य होणार?
इतिहास पाहता पूर्वी अनेक वेळा अशा आश्वासनांचे समाधानकारक निकाल न लागल्याचा उल्लेख करून, २७ गावांच्या विभाजनाच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटल्यावर खरोखर काय साध्य होणार? याबाबत सभेत शंका व्यक्त करण्यात आली. केवळ नवीन आश्वासन मिळून पुढे धोका निर्माण होऊ नये, अशी भूमिपुत्र नेत्यांची भूमिका पाहायला मिळाली.
दोन दुःखद घटना आणि २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेची गरज
सभेत दोन अलीकडील दुर्दैवी घटनांचा उल्लेख करण्यात आला, ज्यामुळे केडीएमसीच्या पाणी व आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्याचे सांगण्यात आले:
1. देसले पाडा दुर्घटना:
स्थानिक भूमिपुत्र बौद्ध समाजातील पोलीस पाटील सुरेश गायकवाड यांच्या पत्नी मीरागायकवाड, सून अपेक्षा, नातू मोक्ष आणि निलेश-मयुरेश या पाच व्यक्तींचा खाणीतील साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.
2. खंबाळपाडा घटना:
आगरी समाजातील विकी भोईर आणि श्रुती अनिल ठाकूर यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला.
या दोन्ही घटना केडीएमसीच्या पाणीपुरवठा व आरोग्य यंत्रणेत गंभीर त्रुटी असल्याचे प्रदर्शन असल्याचे मत सभेत व्यक्त झाले. त्यामुळे २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका असणे अत्यावश्यक असल्याचे ठासून सांगण्यात आले.
भूमिपुत्रांनी स्वतःची राजकीय शक्ती उभारावी: सभेतून आवाहन
सभेत उपस्थित वक्त्यांनी स्थानिक भूमिपुत्र समाजाने ब्राह्मणशाही व भांडवलशाहीविरोधात संघटित होऊन स्वतःचा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करावा, अशी सूचना मांडली. शिवराय, फुले, आंबेडकर व नारायण नागू पाटील यांच्या विचारधारेच्या आधारे सर्व निवडणुका लढवून राजकीय सत्ता व आंदोलनाची ताकद निर्माण करूनच समस्यांचे निराकरण शक्य असल्याचे वक्त्यांनी सांगितले.
३६ जिल्ह्यांतील ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती, मराठा, भटके-विमुक्त आणि अल्पसंख्याक अर्थात बहुजन समाज एकत्र आल्यास स्वतंत्र बहुजनवादी सरकार निर्माण होऊ शकते, असा विश्वासही सभेत व्यक्त करण्यात आला. अशा सरकारच्या माध्यमातून विमानतळ नामांतरासह भूमिपुत्रांचे सामाजिक, आर्थिक, आरोग्य, पाणी, शेती व इतर प्रश्न सोडवता येऊ शकतात, असा मतप्रवाह पुढे आला.
शेवटी, बामसेफ आणि बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्या संघटनात्मक कार्यशैलीतून भूमिपुत्र समाजाने प्रेरणा घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.



Post a Comment
0 Comments