वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍️
(संपादकीय)
कल्याण – शहरात पुन्हा एकदा नशेखोरांचा हैदोस वाढू लागला आहे. रात्रीच्या वेळी भररस्त्यात दारू पार्टी करणाऱ्या काही तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, या घटनेने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी स्मशानभूमीजवळील तलाव परिसरात घडला आहे. या ठिकाणी काही तरुणांनी उघड्यावर मद्यपान करत दारू पार्टी केली. व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर कोळसेवाडी पोलिसांनी तत्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी कल्याण-डोंबिवली पोलिसांनी नशेखोर आणि गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली होती. त्यावेळी परिस्थिती काहीशी सुधारली होती. परंतु पुन्हा एकदा अशा घटनांनी कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
यापूर्वी कल्याण स्टेशन परिसरात पानटपरीवाल्याला सिगारेटसाठी माचिस न दिल्याच्या कारणावरून दोन तरुणांनी कोयत्याच्या जोरावर दहशत माजविली होती. त्या प्रकरणात महात्मा फुले पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली होती. तसेच उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवून अनेक नशेखोरांना तुरुंगात डांबले होते.
सध्या पोलिसांनी व्हायरल व्हिडिओतील आरोपींचा शोध सुरू केला असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. याच परिसरात काही दिवसांपूर्वी कारचालकाची लूट झाल्याचाही प्रकार समोर आला होता. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांकडे कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.


Post a Comment
0 Comments