वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
सोशल मीडिया संपादक मोहन दिपके
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ग्रामविकास, जनजागृती आणि ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत असलेल्या युवाशक्ती ग्रामविकास संघटनेने राज्यातील ग्रामपंचायतीतील प्रशासनिक अडचणींकडे लक्ष वेधत मुख्यमंत्र्याकडे महत्त्वाची मागणी केली आहे.
सध्या राज्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) नियमितपणे उपस्थित राहत नाहीत. यामागचे मुख्य कारण म्हणजे एका ग्रामसेवकावर दोन ते तीन ग्रामपंचायतींचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. या परिस्थितीमुळे दैनंदिन प्रशासन, सरकारी योजनांची अंमलबजावणी, लेखाव्यवहार, तसेच नागरिकांच्या तक्रारी आणि मागण्यांचे वेळेवर निराकरण यावर गंभीर परिणाम होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायत ही लोकशाही व्यवस्थेचा पाया असून गावच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आणि पूर्णवेळ ग्रामसेवक असणे अत्यावश्यक असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. त्यानुसार राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत अधिकारी नेमावा, सध्या रिक्त असलेली सर्व पदे तातडीने भरावीत तसेच एकाही ग्रामसेवकाला एकापेक्षा जास्त ग्रामपंचायतींचा अतिरिक्त चार्ज देऊ नये, याबाबत आवश्यक शासनादेश काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
ही मागणी युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री इमरान पठाण यांनी मंत्रालयात सादर केलेल्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली.



Post a Comment
0 Comments