वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
*कार्यकारी संपादक : रितेश साबळे*
*छत्रपती संभाजीनगर ' दि. १८ : शहरातील सतत वाढणारी लोकसंख्या आणि त्यानुसार नागरिकांना आवश्यक असलेल्या स्वच्छतेच्या सुविधांचा तुटवडा लक्षात घेऊन राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरात तब्बल १०० नवीन ‘पे अॅण्ड यूज’ सार्वजनिक शौचालये उभारण्यात येणार असून,* या निर्णयामुळे स्वच्छता व्यवस्थेत मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हा निर्णय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब बेलदार , सामाजिक न्याय विभागाच्या उपसचिव वर्षा देशमुख तसेच वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
या शौचालयांची दुरुस्ती आणि देखभालीची जबाबदारी स्थानिक सफाई कर्मचाऱ्यांकडे देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे मंत्री शिरसाट यांनी स्पष्ट केले. शहरातील गर्दीच्या, महत्त्वाच्या आणि नागरिकांची नियमित वावर असलेल्या ठिकाणी ही सुविधा उभारली जाणार आहे.
स्वच्छतेच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, *स्थानिक सफाई कर्मचाऱ्यांसाठी रोजगाराची नवी दारेही उघडली जाणार आहेत.*


Post a Comment
0 Comments