वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
कार्यकारी संपादक रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर – शहरातील विभागीय ग्रंथालयाच्या समोर गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेली कचराकोंडी आता तीव्र झाली असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि संपूर्ण वाचनसंस्कृतीवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. शहरातील एकमेव मोठे विभागीय ग्रंथालय असल्याने दररोज ५० ते १०० विद्यार्थी अभ्यासासाठी येथे येतात; मात्र परिसरातील कचऱ्याचे ढिगारे, दुर्गंधी, मोकाट कुत्र्यांचा उपद्रव आणि अस्वच्छ वातावरणामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
महापालिकेकडील संबंधित ट्रान्सफर स्टेशन बंद झाल्यानंतर काही नागरिकांनी येथे कचरा टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे कचऱ्याचे ढिगारे दिवसेंदिवस वाढत गेले. या परिसरात अस्वच्छता वाढून वाचनालयाच्या भिंती देखील खचल्या असल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे.
विद्यार्थी आकाश बोर्डे यांनी सांगितले, “दुर्गंधी आणि कचऱ्यामुळे अभ्यासात मोठा व्यत्यय येतो. इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी अशी परिस्थिती असणे लज्जास्पद आहे.” वाचनालयाचे सहायक संचालक सुनील हुसे यांनीही नाराजी व्यक्त करत म्हटले की, “गेल्या सात वर्षांत अनेक वेळा तक्रारी केल्या; पण काहीही ठोस उपाय झाले नाहीत.”
महापालिका उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले की, ट्रान्सफर स्टेशन बंद झाल्यामुळे निर्माण झालेली समस्या सोडविण्यासाठी पर्यायी उपाययोजना सुरू आहेत. मात्र नागरिकांच्या बेपर्वाईमुळे आणि नियंत्रणाच्या अभावामुळे कचरा पुन्हा जमा होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या परिस्थितीमुळे वाचनालय परिसरातील पर्यावरण, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास यावर मोठा परिणाम होत आहे. नागरिक, विद्यार्थी आणि प्रशासन यांनी एकत्र येऊन दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याची गरज आहे, अशी मागणी विविध स्तरातून होत आहे.



Post a Comment
0 Comments